श्रीरामपूर वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे), ०८ नोव्हेंबर –
शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच मेंढ्या, बोकड व शेळ्या चोरणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीला श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १९ क्विंटल २६ किलो सोयाबीन, अंदाजे ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयाच्या पथकाने केली.दि. १८ ते १९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विजय दिगंबर उंडे यांच्या मातापुर (ता. श्रीरामपूर) येथील शेतातील जाळीच्या कंपाउंडमधील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले ५३ गोण्या (सुमारे २६ क्विंटल) सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ९५०/२०२५ भा.द.वि. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.अपर पोलिस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आणि तांत्रिक विश्लेषणावरून हा गुन्हा सराईत आरोपी सागर गोरख मांजरे व त्याच्या साथीदारांनी केल्याचे समोर आले त्यानंतर पथकाने सापळा रचून आरोपी सागर मांजरे (२८, मातापुर), गणेश ऊर्फ स्वप्नील शिरोळे (४०, मातापुर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दिलीप जाधव (२६, सायखेडा), योगेश भवर (२६, सायखेडा) आणि प्रशांत धात्रक (तुळजाभवानी नगर, नाशिक – फरार) यांच्यासह चोरी केल्याची कबुली दिली.आरोपींनी प्रथम शेडमधील सोयाबीनची पाहणी केली आणि नंतर नाशिकहून छोटा हत्ती वाहन बोलावून गाडी बंद अवस्थेत शेडपर्यंत लोटत नेली. आवाज न करता त्यांनी सोयाबीनच्या गोण्या गाडीत भरल्या आणि व्यापाऱ्याला विकल्या.अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी १९ क्विंटल २६ किलो सोयाबीन, किंमत ६७,४१० रुपये, असा मुद्देमाल हस्तगत केला.
चौकशीत आरोपींनी दि. ११ जून २०२५ रोजी उंबरगाव शिवारातील शेतातील जाळीच्या शेडमधून १५ मेंढ्या, एक बोकड आणि एक शेळी चोरल्याचेही कबूल केले. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५७७/२०२५ बी.एन.एस. कलम ३०५(अ) नुसार गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.कारवाईत पो.स.ई. चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, संतोष दरेकर, सचिन धनाड, पो.ना. रामेश्वर वेताळ, संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाढे तसेच श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. नितीन देशमुख, पो.स.ई. समाधान सोळंके, पो.हे.कॉ. प्रसाद साळवे व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.