कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या पाच गाईंची सुटका;४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे )-

राहुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने पहाटेच्या रात्रगस्ती दरम्यान धाडसी कारवाई करत कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या पाच गाईंची सुटका केली. या कारवाईत महिंद्रा पिकअप वाहनासह एकूण ४ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हद्दीत नियमित पेट्रोलिंग सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी (दि. ३) पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ हे रात्रगस्त घालत असताना रेल्वे स्टेशन रोडवरील तांदूळवाडी (ता. राहुरी) शिवारात एक पिकअप गाडी संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने जाताना दिसली.संशय आल्याने पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला. मात्र चालकाने वाहन रस्त्यावर सोडून सोबतच्या इसमासह अंधाराचा फायदा घेत पळ काढला. गाडीची तपासणी केली असता तीन मोठ्या जर्सी गाई व दोन लहान वासरे अशा पाच जनावरांना दाटीवाटीने बांधून नेले जात असल्याचे आढळले.यानंतर पोलिसांनी पथकाच्या मदतीने वाहन ताब्यात घेऊन जनावरांची सुटका केली. महिंद्रा पिकअपसह जनावरे असा एकूण ४.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा क्रमांक ११३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, तुळशीदास गिते, विजय नवले, संदीप ठाणगे, शकूर सय्यद, जयदीप बडे, नदीम शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास तुळशीदास गिते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *