‘कृपा’ वृद्धाश्रमाचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

राहुरी वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे –
राहुरी रेल्वे स्टेशन परिसरातील इंडिया बायबल चर्च फेलोशिप ट्रस्ट संचलित कृपा वृद्धाश्रमाचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या या संस्थेच्या कार्याचा आढावा घेत कृतज्ञता व सामाजिक बांधिलकीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टच्या अध्यक्षा तथा कृपा वृद्धाश्रमाच्या संचालिका सौं. रोहिणी एरिक सॅकमन होत्या. यावेळी डॉ. अश्विनी रॉबर्ट सॅकमन, सचिव पा. अविनाश सरोदे, व्यवस्थापक पा. किरण गायकवाड, सचिन उमाप, संतोष पवार, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव झावरे आदी मान्यवरांनी उपस्थितांचे तसेच आश्रमाला सातत्याने सहकार्य करणाऱ्या दात्यांचे स्वागत केले.
सामाजिक कार्यकर्ते तथा युवा मंचचे कांताजी तनपुरे म्हणाले, ‘‘देशाची कुटुंबव्यवस्था भक्कम असली तरी अलीकडच्या काळात ती ढासळताना दिसते. अशा वेळी कृपा वृद्धाश्रमासारख्या संस्था वृद्धांना आधार देत आहेत, ही दिलासादायक बाब आहे.’’
लोकनियुक्त नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी आश्रमासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत मार्गदर्शन केले. अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मोहिनीराज होन यांनी आई-वडिलांवरील भावस्पर्शी काव्य सादर केले.
ज्येष्ठ पत्रकार वसंतराव झावरे यांनी गेल्या पाच वर्षांतील आश्रमाच्या कार्याचा आढावा सादर करत, येथे राहणाऱ्या वृद्धांची घेतली जाणारी काळजी आणि सेवाभावाचे कौतुक केले. आश्रमातील श्रीमती जोशी यांनीही आश्रमातील अनुभव कथन करत समाधान व्यक्त केले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व दात्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. जयंतदादा कुलकर्णी, डॉ. चेतनाताई कुलकर्णी, निसारभाई सय्यद, रियाज देशमुख, संतोष लोढा, मधुकर घाडगे, सलीम शेख, ईश्वर खिल्लारी, अमोल पेरणे, रविंद्र शिरसाठ यांच्यासह अनेक मान्यवर व IBCF संस्थेचे पास्टर बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाने ज्येष्ठांच्या सेवेसाठी समाजातील एकजूट आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *