अहिल्यानगर वेब प्रतिनिधी / शरद पाचारणे ०८ नोव्हेंबर –
अहिल्यानगर शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सागर रामनाथ वाघ यांची अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. २२ ते २९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान झालेल्या ई-मतदान प्रक्रियेत महाराष्ट्रातून निवड झालेल्या सहा सदस्यांपैकी डॉ. वाघ यांनी दुसऱ्या क्रमांकाने, तब्बल तीन हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.डॉ. वाघ हे बालरोगतज्ज्ञ, लहान मुलांचे अॅलर्जीस्ट आणि इम्युनोथेरपीस्ट असून ग्रामीण आणि शहरी भागात बाल आरोग्य सुधारण्यासाठी केलेले त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते. राष्ट्रीय व्यासपीठावरून ते क्लिनिकल प्रॅक्टिसमधील गुणवत्तावाढ आणि उपचार पद्धतींचे अद्ययावतरण या दिशेने कार्य करण्याचा आपला स्पष्ट दृष्टीकोन (व्हिजन) मांडत आहेत.याआधी अहिल्यानगरचे डॉ. सूचित तांबोळी यांनी या पदावर कार्य केले होते. या निवडीबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. वाघ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अहमदनगर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुनील म्हस्के, महाराष्ट्र आयएमचे डॉ. निसार शेख, तसेच डॉ. अनिल कुर्हाडे, डॉ. सुभाष फिरोदिया, डॉ. सूचित तांबोळी, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ. विवेक देशपांडे, डॉ. सचिन वहाडणे, डॉ. जयदीप देशमुख, डॉ. उज्ज्वला शिरसाठ, डॉ. संदीप गायकवाड यांसह नगरमधील अनेक बालरोगतज्ज्ञांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. अहमदनगर बालरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे नुकताच डॉ. वाघ यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शहरातील अनेक प्रथितयश डॉक्टर्स उपस्थित होते.डॉ. सागर वाघ हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कै. रामनाथजी वाघ यांचे चिरंजीव, तसेच जयंत वाघ आणि डॉ. धनंजय वाघ यांचे धाकटे बंधू आहेत. त्यांच्या या निवडीमुळे अहिल्यानगरचा गौरव वाढला असल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे.