राहुरी – वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)
राहुरीतील पांडुरंग मंगल कार्यालय येथे बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता भारतीय जनता पार्टी व महायुतीतर्फे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राहुरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या आकस्मिक निधनानंतर, युवा नेते तथा भाजपा युवक जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय या मेळाव्यात होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.या मेळाव्यास राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्रामभैय्या जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, युवा नेते अक्षय कर्डिले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात काही महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपा व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना या ऐतिहासिक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.