राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)०३ नोव्हेंबर :-
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र, अहिल्यानगर यांच्या मार्फत तसेच डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि ग्रामपंचायत ब्राह्मणी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय सहाय्यक साधन मोफत वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे शिबिर रविवार, दिनांक २ नोव्हेंबर आणि सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आले. या शिबिरात ब्राह्मणी परिसरातील एकूण ७२१ ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांची तपासणी होऊन ते पात्र ठरले. या सर्वांना मिळणाऱ्या सहाय्यक साधनांची एकूण किंमत ₹६७ लाख १३ हजार २३८ इतकी असून लवकरच माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे आणि अक्षय दादा कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत या लाभार्थ्यांना साधनांचे वाटप करण्यात येणार आहे,ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घराघरात पोहोचवू अशी माहिती राहुरी तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांनी दिली.
शिबिराच्या सुरुवातीला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील व दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर वारकरी संप्रदायाचे तालुकाध्यक्ष बाळकृष्ण नाना बानकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य विक्रमराव तांबे, सरपंच सौ. सुवर्णाताई बानकर, उपसरपंच महेंद्र तांबे, विजय बानकर, सोसायटी चेअरमन शिवाजी राजे भागवत, देशमुख दादा हापसे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, संचालक मंडळ सदस्य आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र, अहिल्यानगरचे डॉ. भालेराव, डॉ. मेरेकर, डॉ. अनाप व त्यांच्या टीमने शिबिरादरम्यान मोलाची सेवा बजावली. पात्र ज्येष्ठ नागरिकांनी सरकारचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
या दोन दिवशीय शिबिराचे यशस्वी आयोजन भाजप तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले.