राहुरी, ता. 3 वेब प्रतिनिधी,(शरद पाचारणे): राहुरी तालुक्यातील कापूस खरेदीदार व्यापाऱ्यांनी आजपासून (सोमवार, दि. 3 नोव्हेंबर 2025) कापूस खरेदी बेमुदत काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राहुरी तालुक्यातील बोरटेक येथे एका कापूस विक्रेत्याने व्यापाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमबाजी केली, तसेच सोशल मीडियावर व्यापाऱ्यांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, राहुरी तालुक्यातील सर्व कापूस व्यापारी एकत्र येत कापूस खरेदी तात्काळ बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, “कापूस खरेदीदारांना सतत धमक्या, सोशल मीडियावर टीका आणि अपमानास्पद वर्तन सहन करणे अशक्य झाले आहे. जोपर्यंत व्यापाऱ्यांच्या सुरक्षेबाबत आणि सन्मानाबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत कापूस खरेदी पुन्हा सुरू होणार नाही.”
रविवारी झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला की, राहुरी बाजार समिती तसेच तहसीलदार यांची लवकरच भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि समस्या प्रशासनापुढे मांडल्या जातील. तसेच पुढील धोरण ठरवण्यासाठी लवकरच व्यापाऱ्यांची आणखी एक बैठक घेण्यात येणार आहे.
यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कापूस खरेदी बंद राहिल्याने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्रांवर थांबणार असून, परिस्थिती किती दिवस अशीच राहील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.