तलवारीचा धाक दाखवत तरुणाची लूटमार! राहुरी पोलिसांनी आरोपीस केले गजाआड

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)३० ऑक्टोबर २०२५ :-
गणपतवाडी, मानोरी परिसरात तरुणाला तलवारीचा धाक दाखवत लुटमार केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 1105/2025 बीएनएस कलम 119(1) व अन्य कलमांसह आर्म अॅक्ट कलम 4, 25 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अक्षय पंढरीनाथ विटनोर (रा. गणपतवाडी, मानोरी) हे दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोटरसायकलवरून जात असताना आरोपी आकाश सुनील पोटे व किरण उर्फ बबलू नामदेव पोटे (दोघे रा. गणपतवाडी, मानोरी) यांनी त्यांचा पाठलाग करून अडवले.या दोघांनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्याचवेळी आरोपी आकाश पोटे यांनी फिर्यादीच्या खिशातील ₹29,500 रोख रक्कम जबरीने हिसकावून घेतली. पैसे परत मागितल्यावर आरोपी किरण पोटे याने आपल्या मोटरसायकलवरील तलवार काढून फिर्यादीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी तेथून पळून शेतात लपला. दरम्यान आरोपींनी त्याच्या मोटरसायकलचेही नुकसान केले.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना, आरोपी किरण उर्फ बबलू नामदेव पोटे हा 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलीसह मानोरी येथील रेणुका माता मंदिराजवळ पोलिसांना दिसला.
पोलिस हेडकॉन्स्टेबल संभाजी बडे व विजय नवले यांनी तत्परतेने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून मोटरसायकल जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीस राहुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी (दि. 03 नोव्हेंबर पर्यंत ) सुनावली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी बडे करीत आहेत.सदर कारवाईत पोलीस हवालदार अर्जुन दारकुंडे, विजय नवले, कॉन्स्टेबल संतोष शिंदे यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *