संगमनेर वेब टिम ,२२ ऑक्टोबर २०२५ :
ST प्रवर्गातून धनगर आणि बंजारा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीमुळे आदिवासी समाजात संभ्रमाचे आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. खोटे सांगून गैरसमज पसरवून तरुणांना भडकविण्याचे प्रयत्न सुरू असून या पार्श्वभूमीवर समाजातील सलोखा राखण्यासाठी आणि आरक्षणाचे सत्य जनतेसमोर यावे यासाठी आदिवासी समाजाकडून १ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रांताधिकारी कार्यालय, संगमनेर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाचे निवेदन आज संगमनेर शहर पोलीस स्टेशनला सादर करण्यात आले. समाजात सलोखा कायम ठेवत आरक्षणाचे तत्व अबाधित राहावे, सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेला संघर्ष थांबवावा आणि आरक्षणाचे वास्तव प्रबोधनाद्वारे लोकांसमोर यावे, अशी मागणी संयोजकांनी केली आहे.
ही घोषणा भास्करराव दुर्वे नाना प्रतिष्ठान सभागृह, संगमनेर येथे झालेल्या आदिवासी कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली. बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चात सर्व आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
बैठकीस चेतन कांबळे, राजू शिंगाडे, रवींद्र मेंगाळ सर, अतुल कवटे, चंद्रकांत आहेर, मुकेश पवार, कैलास बुळे, बाळकृष्ण गांडाळ, तुकाराम कोरडे सर, अनिल बर्डे, संतोष बर्डे, रोहिदास जंगले, प्रतीक पोपेरे, राजेंद्र जाधव, हिरामण भुतांबरे, संकेत कोरडे, तुषार कचरे, वैभव डगळे, सोमनाथ केदार, शरद मोरे, गणेश आहेर, नवनाथ केदार, सुखदेव भुतांबरे, गंगाराम वाघ, खेमा वाघ, सुरेश बर्डे, किरण शिंदे, राजेंद्र गंभीर, अजय मोरे, विकास पवार, गोकुळ माळी, डॉ. जालिंदर घिगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.