फटाके नको, पुस्तके द्या! सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक दिवाळीचा संकल्प

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),२० ऑक्टोबर २५ :- पर्यावरण प्रदूषण टाळून ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करण्याचा संकल्प कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या सुमारे अठराशे विद्यार्थ्यांनी केला आहे. दीपावली सुट्टीला जाण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी फटाके न फोडण्याची प्रतिज्ञा घेतली.या संकल्पाच्या जनजागृतीसाठी कृषी विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांनी एक फेरी काढली. यावेळी ‘फटाके नको आम्हाला, पुस्तके द्या वाचायला’ अशा घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे यांनी विद्यार्थ्यांना फटाक्यांमुळे बाहेर पडणारे रासायनिक घटक आणि विषारी वायूंचे मानवी शरीर, तसेच लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि पशुपक्ष्यांवर होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन आगी लागण्याचे आणि मोठ्या नुकसानीचे धोकेही त्यांनी स्पष्ट केले.
फटाक्यांवर खर्च करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी या पैशांचा उपयोग वाचनीय पुस्तके खरेदी करण्यासाठी किंवा आपले छंद जोपासण्यासाठी करावा, असे आवाहन मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे यांनी केले. तसेच, आपल्या सभोवतालच्या गरीब व्यक्तींना दीपावलीनिमित्त मदत करून त्यांनाही आनंदात सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणपूरक दीप लावून दिवाळीचा आनंद घेण्याचा संदेशही त्यांनी दिला.
या पर्यावरणपूरक उपक्रमाकरिता क्रीडा शिक्षक घनश्याम सानप, प्रा. जितेंद्र मेटकर, संतोष जाधव, हलीम शेख, तुकाराम जाधव, संदीप जाधव, बाबासाहेब शेलार, मनीषा आढाव, वैजयंती बुऱ्हाडे, दीप्ती कराळे, मोनाली म्हसे, सविता गव्हाणे, आणि ऋतुजा चव्हाण या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे सभापती डॉ. प्रमोद रसाळ, सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे आणि पर्यवेक्षक मनोज बावा यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *