राहुरी वेब प्रतिनिधी(शरद पाचारणे)१९ ऑक्टोबर २०२५ :- अतिवृष्टीमुळे राहुरी तालुक्यातील उंबरे शिवारातील करपरा नदीला आलेल्या पुरामुळे तीनशेहून अधिक लोकांची वस्ती असलेल्या आदिवासी डाग वस्तीतील जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रशासनाने तातडीने ‘ऑपरेशन रेस्क्यू’ राबवत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. या नैसर्गिक संकटानंतर सणासुदीच्या काळात मदतीचा हात देत राहुरीच्या युगंधरा सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शनिवार दिनक १८ ऑक्टोबर रोजी आदिवासी भगिनींना मानवतेची भेट देण्यात आली.
या उपक्रमात युगंधरा ग्रुपतर्फे 132 महिलांना साड्यांचे वाटप करून दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहून “खऱ्या अर्थाने आमची दिवाळी साजरी झाली,” अशी भावना युगंधरा ग्रुपच्या संस्थापिका विद्या करपे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात पत्रकार गोरक्षनाथ शेजूळ यांनी युगंधरा ग्रुपच्या महिलांनी दाखवलेल्या सामाजिक संवेदनशीलतेचे कौतुक करत आभार मानले. तसेच, या डाग वस्तीतील आदिवासी बांधवांसाठी कायमस्वरूपी निवासाची ‘एकलव्य वसाहत’ उभारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विजय माळवदे यांनी युगंधरा ग्रुप आणि छत्रपती प्रतिष्ठान यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी प्रा. शंकर गावडे आणि पत्रकार लक्ष्मण पठारे यांचीही भाषणे झाली.
या प्रसंगी युगंधरा ग्रुपच्या महिलांनी आदिवासी देवीची खणा, नारळाने ओटी भरून पूजा अर्चना केली. या उपक्रमात युगंधरा सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विद्या करपे, मंजुषा धावडे, प्रमिला गावडे, वर्षा पाटील, गीता जग्गी, डॉ. अरुणा भंडारी, मसुदा दारूवाला, मनीषा महाजन, शैलजा शेवाळे, वैशाली बाचकर, कांता लोखंडे आदींचा सहभाग होता. युगंधरा ग्रुपच्या सदस्य माधवी डोले यांनी साड्या देऊन सहकार्य केले.मानवतेचा झरा जागवणारा हा युगंधरांचा उपक्रम आदिवासी भगिनींच्या मनात दिवाळीचा उजेड पसरवणारा ठरला.