राहता वेब टीम,१६ ऑक्टोबर २५ :- निर्मळ पिंप्री ता. राहाता येथे पंडित श्री. प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेसाठी देशभरातून लाखो भाविक हजर असताना, त्यांच्या मौल्यवान वस्तू, सोन्याचे दागिने व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. विविध ठिकाणी केलेल्या या कारवाईत एकूण २३ महिला व ३ पुरुष अशा २६ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी देण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती (शिर्डी विभाग) व जयदत्त भवर (श्रीरामपूर विभाग) यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.
शिव महापुराण कथा (दि. १२ ते १६ ऑक्टोबर २०२५) दरम्यान मोठ्या गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या सोन्याचे दागिने, मोबाईल, पर्स इत्यादी चोरीस जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शिर्डी, राहाता, लोणी येथे विशेष पथके तयार करून नाकाबंदी, पेट्रोलिंग, लॉज तपासणी आदी उपाययोजना केल्या होत्या.
११ ऑक्टोबर रोजी शिर्डीतील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मिरवणुकीदरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या उत्तर प्रदेश आणि राजस्थान राज्यातील सहा महिलांना (शिल्पा पप्पु कुमार, पुनम राजेश कुमार, अंजली संदीप कुमार, पूजा हनुमान कुमार, दुलारी घुरण कुमार, उन्नी सुरेशचंद्र पवार) पकडण्यात आले. त्यांचेकडे कटर, ब्लेड अशी घातक शस्त्रे मिळाली.
१२ ऑक्टोबर रोजी निर्मळ पिंप्री ते लोणी रस्त्यावर १३ जणांचा गट भाविकांच्या गर्दीत चोरीसाठी तयार होता. पोलिसांनी वेळीच कारवाई करून १० महिला व ३ पुरुषांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे चाकू, कटर, ब्लेड आणि मारुती स्विफ्ट डिझायर कार (एमएच ३२ एएस ५७९०) जप्त करण्यात आली. शिर्डीतील दुसरी कारवाई १४ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री साईबाबा मंदिर परिसरात गर्दीत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या हरीयाणातील सहा आरोपींपैकी दोन महिला (लाली लक्ष्मणसिंग व रुक्मिणी गोपालसिंग) पकडण्यात आल्या. उर्वरित आरोपी गर्दीचा फायदा घेत पसार झाले. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्मळ पिंप्रीतील कारवाई मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाच महिला चोरीसाठी सज्ज अवस्थेत पोलिसांच्या हाती लागल्या. सर्व आरोपी इलाहाबाद, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून त्यांचेकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.या सर्व कारवायांमध्ये सहभागी झालेल्या शिर्डी, लोणी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, नेवासा, सुपा, राहुरी, आश्वी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.या मोहिमेमुळे शिव महापुराण कथा सुरळीत पार पडली असून भाविकांमधून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.