राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)१५ ऑक्टोबर :-अल्पवयीन मुलींचे अपहरण व लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने “ऑपरेशन मुस्कान पार्ट-2” या विशेष जनजागृती उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिन निमित्त सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या कडू पाटील महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना पोस्को कायदा, सायबर गुन्हे आणि मोबाईलचा गैरवापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, अक्षर मानव वाचनालयाचे संस्थापक पंकज कडू पाटील, प्राचार्य सीताराम गारुडकर, मुख्याध्यापिका सौ. विद्या ब्राह्मणे, पर्यवेक्षिका सौ. हेमलता साबळे, तसेच शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत पी.आय. संजय ठेंगे यांनी सांगितले की — “मागील दीड वर्षात ‘ऑपरेशन मुस्कान पार्ट-1’ अंतर्गत आतापर्यंत 91 मुलींची सुटका करण्यात आली असून उर्वरित 11 मुलींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु असे गुन्हे होऊच नयेत, यासाठीच आता ‘ऑपरेशन मुस्कान पार्ट-2’ अंतर्गत शालेय स्तरावर जनजागृती अभियान हाती घेतले आहे.”
वाचन प्रेरणा दिनानिमित्त शंभर पुस्तके वाचून रेकॉर्ड करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करून त्यांच्या वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यात आले.
राहुरी पोलीस स्टेशनचे हे अभियान पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ वाकचौरे, व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात व विशेष पथकाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.