दिव्यांगांसाठी वाढीव निधीची मागणी! प्रहार संघटनेचे देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर निवेदन सादर

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),१२ ऑक्टोबर २५ :-राहुरी प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्था, राहुरी यांच्या वतीने देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात देवळाली नगरपरिषदेकडून दिव्यांगांना मिळणारा निधी सध्याच्या ३% वरून ५% करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.सन २०१८ पासून देवळाली नगरपरिषदेच्या वतीने शहरातील दिव्यांगांना ३% निधीचे वाटप केले जाते. मात्र, वाढती महागाई आणि दिव्यांगांच्या दैनंदिन खर्च, औषधोपचार आदी गरजांचा विचार करता हा निधी अत्यंत तुटपुंजा असल्याचे प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी सांगितले.समान संधी, समान हक्क या दिव्यांग कायदा २०१६ नुसार निधी ३% वरून ५% करण्यात आलेला असून, त्यानुसार देवळाली नगरपरिषदेकडून निधीत वाढ करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या नगरपरिषदेकडून दिव्यांगांना वर्षातून एकदाच प्रत्येकी २००० रुपये दिले जातात. सन २०२४-२५ साली दोन टप्यांत २००० व १२३४ रुपये असे निधी वाटप करण्यात आले.
दिव्यांगांच्या हक्कासाठी केलेल्या या निवेदनात पुढील प्रमाणे निधी वाढीची मागणी करण्यात आली आहे
८०% ते १००% दिव्यांग : ₹६,०००,६०% ते ८०% दिव्यांग : ₹५,०००,४०% ते ६०% दिव्यांग : ₹४,०००,तसेच सन २०२५-२६ चा निधी दीपावलीपूर्वी वितरित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा माहितीच्या अधिकाराद्वारे निधीचा हिशोब मागविण्यात येईल आणि ५% निधीचा वापर दिव्यांग बांधवांसाठीच व्हावा, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली आहे.याशिवाय, दिव्यांगांचे बैठक व कार्यक्रम घेण्यासाठी नगरपरिषदेकडून स्वतंत्र ‘दिव्यांग भवन’ अथवा गाळा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. अन्यथा प्रहार संघटनेचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, तालुका अध्यक्ष योगेश लबडे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मौ. ऊमर शेख, रमेश गुलदगड, बाबाजान शेख, नवनाथ पिंपळे, बाबासाहेब सोनवणे, कातीलाल गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *