राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)१० ऑक्टोबर २५ :- प्रहार दिव्यांग संघटना आणि दिव्यांग शक्ती सेवा संस्था, राहुरी यांच्या वतीने राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिव्यांगांना मिळणाऱ्या वार्षिक आर्थिक सहाय्यात वाढ करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
सध्या दिव्यांगांना वर्षातून एकदाच मिळणारा निधी केवळ 3,000 रुपये असून तो अत्यंत तुटपुंजा असल्याने त्यांच्या गरजा भागत नाहीत. त्यामुळे हा निधी वाढवून किमान 10,000 रुपये देण्यात यावेत, अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केली.
सन 2017 पासून नगरपरिषदेने दिव्यांगांसाठी केवळ 3% निधीची तरतूद केली असून ती आजही बदललेली नाही. दिव्यांग समान हक्क कायदा 2016 नुसार आता 5% निधी राखून ठेवणे बंधनकारक आहे, तरीदेखील राहुरी नगरपरिषदेकडून त्यानुसार कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, असा आरोप संघटनेने केला.नगरपरिषदेने दिव्यांगांसाठी कोणत्याही पायाभूत सुविधा, व्यवसाय मार्गदर्शन, स्वयंरोजगार योजना किंवा आवश्यक साहित्य पुरवलेले नाही. एवढेच नव्हे तर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील लिफ्ट गेल्या चार-पाच वर्षांपासून बंद असून तिची दुरुस्तीही झालेली नाही, अशी तक्रार निवेदनात करण्यात आली.
संघटनेने पुढे मागणी केली की -80% ते 100% दिव्यांगत्व असणाऱ्यांना ₹10,000,60% ते 80% दिव्यांगत्व असणाऱ्यांना ₹9,000,40% ते 60% दिव्यांगत्व असणाऱ्यांना ₹8,000 इतकी रक्कम देण्यात यावी.तसेच लिफ्टचे तात्काळ टेंडर काढून दुरुस्ती करण्यात यावी.
ही मागणी मान्य न झाल्यास प्रहारचे संस्थापक हृदयसम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे, तालुकाध्यक्ष योगेश लबडे, तालुका सचिव रवींद्र भुजाडी, शहराध्यक्ष जुबेर मुसानी, कार्याध्यक्ष संजय देवरे, उपाध्यक्ष जालिंदर भोसले, तालुका संघटक राजेंद्र घनवट आदी पदाधिकारी उपस्थित होते.