विजय तमनर यांचा आक्रमक पवित्रा: राहुरी कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांसाठी १७ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),०७ ऑक्टोबर २५ :-
महात्मा फुले कृषी विद्यापीठात (MPKV), राहुरी येथे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय दिरंगाईविरोधात यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी थेट १७ ऑक्टोबर २०२५ पासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.कृषिमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही तमनर आंदोलनावर ठाम . या विषयावर विजय तमनर यांनी आज मुंबईत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. मंत्र्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी, विद्यापीठाच्या मागील अनुभवामुळे तमनर यांनी आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट केले आहे.तत्पूर्वी, २९ सप्टेंबर २०२५ रोजी तमनर यांनी कृषिमंत्री भरणे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले होते. विजय तमनर यांनी विद्यापीठ प्रशासनासमोर १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत खालील दोन मुख्य मागण्या पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली आहे:१)वर्ग चार संवर्ग: प्रकल्पग्रस्तांच्या विशेष भरती मोहिमेअंतर्गत निवड यादीत असलेल्या उमेदवारांना त्वरित नियुक्ती आदेश द्यावेत. २)वर्ग तीन संवर्ग: वर्ग तीन संवर्गातील भरतीसाठी तात्काळ परीक्षा वेळापत्रक जाहीर करावे.या मागण्या पूर्ण न झाल्यास, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी विजय तमनर हे राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. कृषी मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही विद्यापीठ प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *