देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या रणनितीसाठी प्रहारचा उद्या विचारमंथन मेळावा

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),०७ ऑक्टोबर २५ :- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात दिशा ठरवण्यासाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा विचारमंथन मेळावा उद्या बुधवार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५.०० वा. राहुरी फॅक्टरी येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.या बैठकीत देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी की आघाडीच्या स्वरूपात सहभागी व्हावे या महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणार असून, यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख चंद्रकांत कराळे यांनी दिली आहे.बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा होणार असून, या बैठकीसाठी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रहारचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रहारच्या कार्याला आणि विचारधारेस मानणारे सर्व समविचारी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत कराळे यांनी केले आहे.या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, राहुरी फॅक्टरी शहर प्रमुख शरद खांदे, देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहर संपर्कप्रमुख गणेश भालके, शहर संघटक प्रभाकर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत स्थानिक नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवारी निवड, स्थानिक प्रश्नांवर पक्षाची भूमिका, मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी आखण्यात येणारी रणनिती यावर देखील चर्चा होणार असून, या मेळाव्याद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाचे पुढील राजकीय धोरण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *