राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)२९ सप्टेंबर :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीत प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रियेत होत असलेल्या जाणीवपूर्वक विलंबामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी विद्यापीठ प्रशासनावर कठोर शब्दांत टीका करत येत्या १७ ऑक्टोबरपासून दिवाळीच्या काळात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने शासनाने प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यासाठी विशेष भरती प्रक्रियेचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विद्यापीठाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, भरती प्रक्रियेत झालेला विलंब लक्षात घेता तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ३० जून २०२५ रोजी मंत्रालयात बैठक घेऊन लेखी परीक्षा नसलेल्या वर्ग-४ पदांच्या नियुक्त्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
तरीदेखील आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी १७ ऑगस्ट रोजी प्रकल्पग्रस्त उमेदवारांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करावे लागले. त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी वर्ग-४ संवर्गाची व्यावसायिक चाचणी घेण्यात आली व ८ सप्टेंबरला निकाल जाहीर झाला. मात्र, अद्याप नियुक्ती आदेश निर्गमित झालेले नाहीत.
याबाबत विद्यापीठ प्रशासन मौन बाळगत असून, प्रभारी कुलगुरूंच्या कारभारातील दिरंगाईमुळे गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. विजय तमनर यांनी कृषी मंत्री, पालकमंत्री तसेच कुलगुरूंना निवेदन देऊन नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तरीदेखील आदेश काढण्यात विलंब होत असल्याने प्रकल्पग्रस्त उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड असंतोष आहे. “१७ ऑक्टोबरपर्यंत नियुक्ती आदेश निर्गमित झाले नाहीत आणि वर्ग-३ संवर्गाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले नाही, तर दिवाळीच्या काळात मी आमरण उपोषणास बसणार आहे,” असा इशारा तमनर यांनी दिल्याने या प्रकरणाने चांगलाच तणाव निर्माण झाला आहे.