मा. मंत्री प्राजक्त तनपुरे यांची राहुरी तालुक्यात पाहणी: ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि सरसकट कर्जमाफीची मागणी

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)२९ सप्टेंबर :

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथील माहुचा मळा परिसरासह मल्हारवाडी आणि घोरपडवाडी या भागांना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सलग आणि मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांचे झालेले प्रचंड नुकसान पाहून त्यांनी तात्काळ ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची आणि सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे.

माजी मंत्री तनपुरे यांनी पाहणीदरम्यान सांगितले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेली मका, घास, कपाशी, सोयाबीन अशी विविध पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतमाळ गुडघाभर पाण्याखाली गेले असून, शेतकरी बांधवांनी घेतलेले परिश्रम क्षणात वाहून गेले आहेत.

यावेळी त्यांनी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे मत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या नुकसानीची तीव्रता लक्षात घेता, भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी हीच खरी काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अन्यथा, अतिवृष्टी आणि कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी बांधवांचा धीर पूर्णपणे खचेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

आज शेतकरी निराशेच्या गर्तेत ढकलले गेले आहेत. अशा वेळी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून योग्य ती मदत करणे ही सरकारची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी आहे, असे मत प्राजक्त तनपुरे यांनी मांडले.

यावेळी उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांनी आपली व्यथा माजी मंत्र्यांसमोर मांडली.

यावेळी नारायण जाधव, किशोर कोहकडे, मंगेश गाडे, हरिभाऊ हापसे, राजू गाडे, विश्वास तात्या पवार, गोवर्धन गाडे, सुरेश गाडे, भाऊसाहेब गाडे, सुभाष गाडे, विक्रम गाडे, सौरभ गाडे, किशोर गाडे, सोमनाथ गाडे, रज्जाक इनामदार, लहू थोरात, भास्कर गाडे, प्रकाश गाडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *