राज्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातलेला असताना राहुरी मतदार संघातही अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे, घरांचे नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, पोलीस यंत्रणा यांना सूचना देऊन आपत्कालीन परिस्थितीत सर्वांनी अलर्ट मोडवर काम करावे अशा सूचना आ.शिवाजीराव कर्डिले यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
आ.कर्डिले म्हणाले की, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुळा धरण प्रशासनाला नदीकाठावरील लोकांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे सांगितले असून शनिवारी रात्री राहुरी तालुक्यातील बहुतांशी गावात जोरदार अतिवृष्टी झाली आहे. यामुळे गावागावातील नदी, नाले, ओढे यांना पूर आला असून शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गाव पातळीवर अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी शेतात जाणे देखील बिकट झाले आहे. संबंधित गावात तात्काळ सरसकट पंचनामे होणे अपेक्षित आहे. याकामी स्थानिक पातळीवर अधिकारी कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास कारवाई करावी याबाबतच्या आवश्यक त्या सूचना प्रशासनाला आपण दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे शेतकरी व पशुपालक यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे शासनाकडे यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे असे आ.शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.