राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ),२८ सप्टेबर :
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिंपरी अवघड गावात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेच, पण त्याचबरोबर गावातील दलित, आदिवासी आणि इतर समाजातील अनेक शेतमजुरांची घरे पडली आहेत. अनेक घरांचे पंचनामे तलाठ्यांनी केले आहेत.
ग्रामपंचायत हद्दीतील जागेत परवानगी नसल्यामुळे अनेक कुटुंब घरकुल यादीत नाव असूनही घरांपासून वंचित आहेत. पिंपरी अवघड गाव देव नदीच्या काठावर वसलेले आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात शासकीय जमीन असली तरी ती सर्व नदीच्या कडेला असल्याने पावसाळ्यात पुराचा धोका वाढतो.
27 कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर
मुंजोबा देवस्थानापासून राजवाडा गायकवाड वस्ती ते प्रकाश थोरात, वैरागळ या सर्व कार्यक्षेत्रात आज रोजी पुराचे पाणी असल्याने किमान 100 पेक्षा जास्त कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. यापैकी 27 कुटुंबांतील 145 व्यक्तींना तातडीने जिल्हा परिषद शाळा, पिंपरी अवघड येथे सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले आहे.
याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, मंडलाधिकारी,तलाठी, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबांना स्वतः वर्गणी करून खाण्यापिण्याच्या वस्तू आणून त्यांच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्था केली. अजूनही पावसाचे वातावरण असल्याने अधिक कुटुंबांची सोय करण्याची आवश्यकता असल्याचे तलाठी तुषार काळे, मंडलाधिकारी विजय बेरड आणि शिक्षक शिवाजी कुलट यांनी माहिती दिली.
गावठाण वाढीसाठी 5 हेक्टर जमिनीची मागणी
गावातील या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गावठाण वाढीची महत्त्वपूर्ण मागणी शासनाकडे केली आहे. पिंपरी अवघड गावाला गावठाण वाढीसाठी लगत असलेल्या कृषी विद्यापीठाच्या शासकीय क्षेत्रातील किमान पाच हेक्टर जमीन देण्यात यावी, अशी मागणी राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे संपर्क साधून करण्यात आली.
या मागणीसाठी उद्या ग्रामपंचायत मार्फत लेखी निवेदन पाच हेक्टर गावठाण वाढीसाठी ग्रामस्थ देणार असल्याचे समजते. नदीच्या कडेला असलेल्या धोक्याच्या जागेतून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी वसवण्यासाठी ही जमीन आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.