राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),२५ सप्टेंबर : येथील पोलिस उपअधीक्षक एकनाथ पाडळे यांचे चिरंजीव अनिकेत एकनाथ पाडळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले असून त्यांची राज्य कर निरीक्षक पदावर निवड झाली आहे.
अनिकेत यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये पूर्व परीक्षा दिली होती, तर मुख्य परीक्षा २९ जून २०२५ रोजी झाली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१६) जाहीर झाला. इंजिनियरिंग पदवी संपादन केल्यानंतर अनिकेत यांनी एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासास सुरुवात केली होती. कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी यश मिळवत राज्य कर निरीक्षकपदी स्थान पटकावले आहे.
कुटुंबात शैक्षणिक व प्रशासकीय परंपरेचा वारसा पुढे नेत, त्यांचे मोठे बंधू संकेत पाडळे हे संभाजीनगर शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर लहान बंधू ऋषिकेश पाडळे मल्टीनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. अनिकेत हे राहुरी नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी मोहन किसन पातोरे यांचे नातू आहेत.
राहुरी शहरासह संपूर्ण परिसरातून अनिकेत पाडळे यांच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.