राहुरी, वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ) ता. 23 सप्टेंबर : दसऱ्याच्या दिवशी राजा रावणाचे दहन करून आदिवासी व बहुजन समाजाच्या भावना दुखावणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र व युवा रावण प्रतिष्ठान राहुरी शहर यांच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या निवेदनात म्हटले आहे की, राजा रावण हा आदिवासी व बहुजन समाजात आदराचे स्थान असलेला पुराणातील विद्वान व शूरवीर राजा आहे. देशात रावणाची मंदिरे आहेत, अनेक गावांची व व्यक्तींची नावे ‘रावण’शी जोडलेली आहेत. मात्र काही धर्मांध व जातीयवादी संघटनांनी रावण दहनाची कुप्रथा निर्माण करून समाजभावना दुखावण्याचे काम सुरू केले आहे. या कृतीमुळे भविष्यात सामाजिक संघर्ष निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे रावण दहन करणाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावर डॉ. जालिंदर घिगे, संदीप कोकाटे, चेतन कांबळे, कुमार भिंगारे, राजू ठाकर, राजू जाधव, महेश साळवे, वर्षाताई बाचकर, पोपट दळे, सागर दोंदे यांच्या सह्या आहेत.
दरम्यान, युवा रावण प्रतिष्ठान राहुरी शहरानेही तहसीलदारांना स्वतंत्र निवेदन दिले आहे. त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी समाजाचे दैवत राजाधिराज महाबली दशानन रावण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्यास किंवा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर तत्काळ अनुसूचित जमाती प्रतिबंध कायद्यानुसार फौजदारी कारवाई करावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
युवा रावण प्रतिष्ठानच्या निवेदनावर महेश साळवे, अमोल पवार, संदीप पवार, विजय कर्डक, सनी राऊत, आबा पवार, सोमा पवार, शाहरुख खान, राजू ठाकर, ओंकार पवार, कार्तिक पवार, आर्यन गायकवाड, कार्तिक मिसाळ, रोहन भोसले, सिद्धार्थ साळवे, गणेश पवार, निखिल मासरे, सुरेश ढोले, सुधीर गायकवाड, स्वप्निल पवार आदींसह अनेकांनी सह्या केल्या आहेत.