अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शहर व परिसरात वाढत्या मालाविरुद्ध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (L.C.B.) केलेल्या कारवाईत चास घाटाजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेला कुख्यात गुंड गौरव हरीभाऊ घायाळ याच्यासह पाच जणांना जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ₹७,९०,६००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिस अधीक्षकांचा आदेश
मा. पोलिस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील गंभीर गुन्हे उघडकीस आणणे व प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोनि किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना दिले होते. या आदेशान्वये सपोनि हरिष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले.
या पथकात पोउपनि अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार लक्ष्मण खोकले, हृदय घोडके, दिपक घाटकर, राहुल द्वारके, सुरेश माळी, अतुल लोटके, भिमराज खर्से, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोखे, सोमनाथ झांबरे, भगवान थोरात, विशाल तनपुरे, योगेश कर्डिले, भगवान धुळे, महादेव भांड आदींचा समावेश होता.
गुप्त माहितीवरून सापळा
२० सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री तपास पथक दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सपोनि हरिष भोये यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अहिल्यानगर-पुणे रोडवरील चास घाटाजवळ काळ्या रंगाचे इनोव्हा वाहन (एमएच-०१-व्हीए-७४२२) उभे असून त्यात कुख्यात गुंड गौरव घायाळ व त्याचे साथीदार दरोड्याची तयारी करत आहेत.
मिळालेल्या माहितीची खात्री करून पथकाने पहाटे ३.५० वाजता कारवाई केली. इनोव्हा वाहन रोडच्या कडेला अंधारात उभे असल्याचे दिसले. संशयितांना तात्काळ वेढा घालून ताब्यात घेण्यात आले.यावेळी ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
गौरव हरीभाऊ घायाळ (२४, सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर),सतीश बाळासाहेब पावडे (३५, मूळ रा. दरोडी, सध्या सुपा, ता. पारनेर),अनिकेत रमेश साळवे (२९, सुपा, ता. पारनेर),विशाल सुरेश जाधव (२३, सुपा, ता. पारनेर),गोविंद बबनराव गाडे (३६, सुपा, ता. पारनेर),सदर आरोपी कडून जप्त केलेला मुद्देमाल संशयितांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली. त्यातून पुढीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला –
₹३०,०००/- किमतीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस,₹५००/- किमतीची तलवार,₹१००/- किमतीचा गिलव्हर,बेसबॉलचा दांडका,₹६०,०००/- किमतीचे ६ मोबाईल फोन,₹७,००,०००/- किमतीचे इनोव्हा चारचाकी वाहन,एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹७,९०,६००/- एवढी आहे.
या कारवाईमुळे परिसरातील दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.