राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),२० सप्टेंबर: – आदिवासी (ST) प्रवर्गातून बंजारा समाजाने केलेल्या कथित असंवैधानिक आरक्षण मागणीमुळे आदिवासी समाजात संभ्रमाचे तसेच संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. खोटी माहिती पसरवून तरुणांना भडकवले जात असल्याचा आरोप करून या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाने राहुरी तहसील कार्यालयावर १ ऑक्टोबर २०२५ रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे.
आरक्षणाचे तत्त्व अबाधित ठेवणे, समाजात सलोखा कायम राखणे तसेच सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेल्या संघर्षाला आळा घालणे, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या संदर्भातील निवेदन शुक्रवारी राहुरी येथील नायब तहसीलदार संध्या दळवी यांना सादर करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. जालिंदर घिगे, संदीप कोकाटे, देवराम जाधव, नानासाहेब भले, विवेक तळपे, हिरामण जाधव, बंडू वायळ, राजु ठाकर, शांताराम महाराज आंबेकर, दगडू भले, संकेत कोरडे, राजेंद्र जाधव, गणेश काळे, गोपीनाथ केदार, बाळू मधे, विजय गांगड, अशोक मधे, विकास गावडे, सुभाष काळे, नानाभाऊ मधे आदी उपस्थित होते.
आदिवासी समाजाने स्पष्ट केले की, खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी न पडता खरी वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी व आपले अधिकार अबाधित राहण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे.