राहुरी वेब प्रतिनिधी,(शरद पाचारणे )१७ सप्टेंबर – राहुरी शहरातील रस्त्यांची भीषण दुरवस्था, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांना भेडसावणारा त्रास याच्या विरोधात नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. संस्थापक सौरभ उंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नगर परिषदेवर नेण्यात आला.
या मोर्चादरम्यान नागरिकांनी “खड्डेमुक्त राहुरी आमचा हक्क”, “कर भरतो आम्ही – रस्ता द्या तुम्ही” अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाचा जाब विचारला. विशेष म्हणजे, एका युवकाने खड्ड्यात बसून त्यातील पाण्याने अंघोळ करून आगळावेगळा निषेध नोंदवल्याने मोर्चा सर्वत्र चर्चेत राहिला.
सौरभ उंडे यांनी इशारा देत सांगितले की, “नवरात्र उत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर पुन्हा नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला जाईल.”
कुलकर्णी हॉस्पिटल, शुक्लेश्वर चौक, विद्यामंदिर शाळा परिसर, शिवाजी चौक आणि मेन रोड मार्गे हा मोर्चा नगर परिषद कार्यालयापर्यंत पोहोचला. महिलांचा तसेच तरुणांचा मोठा सहभाग या आंदोलनात पाहायला मिळाला.
मोर्चा दरम्यान नाना शिंदे, सचिन बोरुडे, जानवी उंडे, साक्षी लोळगे, सीमा उंडे, नूतन उंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच सचिन घाडगे, सागर शेटे, जयंत उंडे, विलास कदम, युवराज तनपुरे, रवी तनपुरे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले. महिला वर्गातूनही सीमा उंडे, अनिता उंडे, सुनिता शेटे, ज्योती लोळगे, स्वाती ढवळे यांसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मोर्चानंतर नागरिकांचे निवेदन प्रशासक विकास घटकांबळे यांनी स्वीकारले. त्यांनी नवरात्र उत्सवापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त झाले.
नाथ प्रतिष्ठानच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून नागरिकांना लवकरात लवकर “खड्डेमुक्त राहुरी” पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.