वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ) दि.१५ : राहुरी – श्रीक्षेत्र धानोरे घाट (ता. राहुरी, जि. आहिल्यानगर) येथे श्री अंबिका माता व कळमजाई माता नवरात्र उत्सवानिमित्ताने पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भजनी मंडळ तसेच धनेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने आणि ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव सोमवार दि. २२ सप्टेंबर ते गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार असून यावर्षीच्या उत्सवाचे हे ३८ वे वर्ष आहे.
सध्या उत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने परिसर स्वच्छता, आर्थिक नियोजन, कलश रोहन, मिरवणुका, घटस्थापना, किर्तन नियोजन, दररोजच्या अन्नदानाची व्यवस्था, संतपूजन, मंडप उभारणी, विजेची रोषणाई, पाणी व्यवस्थापन आदी तयारी जोमात सुरू आहे.
उत्सव काळात सकाळी व सायंकाळी ६.३० वा. पंचोपचार पूजा व देवीची आरती तसेच सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत हरिपाठ आणि रात्री ७ ते ९ या वेळेत जाहीर हरिकिर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी मंदिरावरील कलश रोहनाचा कार्यक्रम तसेच देवीची गोंधळ मिरवणूक होणार आहे.
या कालावधीत ह.भ.प. गुरुदेव महाराज धारणगावकर, ह.भ.प. महेश महाराज रिंधे, ह.भ.प. विश्वनाथ महाराज गिरी, ह.भ.प. संदीप महाराज खंडागळे, ह.भ.प. अरुण महाराज दिघे, ह.भ.प. निलेश महाराज कोरडे, ह.भ.प. बालयोगी अमोल महाराज जाधव (वाकोडी संस्थान), भागवताचार्य ह.भ.प. राधीकाताई करंजीकर, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज काळे (समाजप्रबोधनकार), ह.भ.प. जयश्रीताई तिकांडे (माझा ज्ञानोबा मालिका फेम – मायबोली चॅनल) आदी नामवंत प्रवचनकारांचे जाहीर हरिकिर्तन होणार आहे. तसेच ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे काल्याचे किर्तनही होणार आहे.
नवरात्र उत्सव काळात होणाऱ्या या कार्यक्रमांचा परिसरातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शारदीय नवरात्र उत्सव समिती व धनेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त शहाजी सुखदेव दिघे यांनी केले आहे.