राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे रस्त्याच्या वादातून अंगणवाडी सेविकेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीता दीपक भुजाडी (अंगणवाडी सेविका, रा. मुसळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेत व वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत त्यांचे व बाळासाहेब नामदेव भुजाडी यांच्यात दिवाणी वाद सुरू आहे. दिनांक १० सप्टेंबर रोजी दुपारी तहसीलदार यांच्या हस्तक्षेपाने मुसळवाडी शिवारातील गट क्र. ८२ मधून गट क्र. ८१ कडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला होता.
तथापि, त्याच रात्री सुमारे ९.५५ वाजता चैतन्य किशोर भुजाडी हा लाल रंगाचा ट्रॅक्टर घेऊन आला व त्याने सदर रस्त्यावर जनावरांचे शेणाचे ढिगारे लोटून रस्ता बंद केला. त्यावेळी नीता भुजाडी यांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले असता, तेजश्री बाळासाहेब भुजाडी हिने त्यांच्या डोक्याचे केस ओढून “पुढे कुठे व्हिडिओ काढायला चाललीस मागे हो” असे म्हणत अडवले.
दरम्यान, सुनीता भुजाडी, योगिता भुजाडी, कविता भुजाडी व हर्षदा भुजाडी यांनी नीता भुजाडी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून “तुमचा या रस्त्याशी काही संबंध नाही” अशी धमकी दिली. तर शोभा भुजाडी, अर्चना भुजाडी व भगवान बाळासाहेब तनपुरे यांनी शिवीगाळ केली.
या प्रकरणी राहुरी पोलिसांनी सुनीता बाळासाहेब भुजाडी, योगिता किशोर भुजाडी, कविता अतुल भुजाडी, हर्षदा बाळासाहेब भुजाडी, तेजश्री बाळासाहेब भुजाडी, शोभा मोहन भुजाडी, अर्चना आप्पासाहेब भुजाडी, चैतन्य किशोर भुजाडी (सर्व रा. मुसळवाडी) व भगवान बाळासाहेब तनपुरे (रा. पिंपळाचा मळा, राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे पुढील तपास करत आहेत .