राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ) १४ सप्टेबर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान, राहुरी यांच्या वतीने माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन, एस.बी.आय. फाउंडेशन, आरोग्यम योगा सेंटर व बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला-बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ. सौ. उषाताई तनपुरे, माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामदास बाचकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांच्या हस्ते फीत कापून योगा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांनी केले. त्यांनी प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये महिलांसाठी योगा सेंटर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका, वृक्षारोपण, नेत्र तपासणी शिबिर, कॅन्सर निदान शिबिर आदी उपक्रमांचा समावेश आहे.
योगा सेंटरच्या प्रमुख सौ. योजनाताई लोखंडे यांनी महिलांच्या आरोग्य व मानसिक संतुलनाबाबत मार्गदर्शन केले. तर डॉ. स्वप्नील माने यांनी एस.बी.आय. फाउंडेशनच्या माध्यमातून दर महिन्याला कॅन्सर निदान फिरते सेंटर उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली.
दरम्यान, राहुरी नगर-मनमाड रस्त्यावरील अपघातांमध्ये मृत्यू झाल्यामुळे प्राजक्त दादांनी आपले सर्व वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले. मात्र, अहिल्या भवन येथे वृक्षारोपण व शिबिरासाठी ते उपस्थित राहिले व मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमादरम्यान बुधराणी हॉस्पिटल पुणे तर्फे 270 नेत्र तपासण्या, 60 रुग्णांना चष्म्यांचे वाटप, 13 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे रवाना करण्यात आले. तसेच डॉ. माने मेडिकल फाउंडेशन व एस.बी.आय. फाउंडेशन यांच्यावतीने 350 रुग्ण तपासणी, 3 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया आणि औषधी वृक्ष लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी प्राजक्त दादा तनपुरे यांच्या संवेदनशील कार्यशैलीचे कौतुक करून भविष्यात राज्याच्या राजकारणात त्यांना मोठी संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आभार रामदास बाचकर यांनी मानले. सूत्रसंचालन अनिल डोलनर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, योगा सेंटरच्या महिला पदाधिकारी व डॉ. माने मेडिकल फाउंडेशनच्या टीमने विशेष प्रयत्न केले.