राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) १३:नगर-मनमाड महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालल्याने गेल्या दहा दिवसांत सात नागरिकांचे बळी गेले आहेत. या दुर्घटनांच्या निषेधार्थ राहुरीकरांनी आज (शुक्रवार) मुळा नदी पुलाजवळ प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन छेडले होते. प्रशासनाने अवजड वाहतूक बाह्य मार्गावरून वळवण्याचे आणि महामार्गावरील खड्ड्यांबाबत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मात्र, संध्याकाळी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र शेतकरी सेनेचे उपाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी प्रशासनाच्या या आश्वासनाची पोलखोल केली. राहुरी शहरातील बाजार समितीसमोर उभे राहून त्यांनी अवजड वाहतूक करणाऱ्या प्रत्येक ट्रकचालकाला थांबवून विचारणा केली. त्यावेळी अनेक ट्रक दिल्ली, हरियाणा, सिलवासा आदी परप्रांतीय भागांतून आले असल्याचे स्पष्ट झाले. यावरून प्रशासनाने दिलेले आश्वासन फोल असल्याचे उघड झाले.
मोरे यांनी तात्काळ ही वाहतूक बंद न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. या वेळी त्यांच्यासोबत रविकिरण ढुस, सचिन म्हसे, किशोर वराळे, धनंजय लहारे, प्रमोद पवार, अरबाज शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.