राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)१२ सप्टेंबर : राहुरी तालुक्यातील टाकळीमियां येथील सामाजिक कार्यकर्त्या व रमाई प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा स्नेहल सुरेंद्र सांगळे यांची महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालयाच्या ‘सिमेंट व सिमेंटवर आधारित उद्योग’ या मंडळाच्या तज्ञ सल्लागार समितीवर नाशिक विभागातून सदस्य म्हणून निवड झाली आहे. ग्रामीण भागातील कामगार व उद्योग क्षेत्रातील प्रश्नांना प्राधान्याने वाचा फोडण्याची ही संधी मिळाल्याने सांगळे यांच्या नियुक्तीचे व्यापक स्वागत होत आहे.
कामगार आयुक्तालय, मुंबई यांच्याकडून नुकत्याच प्रसिध्द झालेल्या शासकीय पत्राद्वारे ही नियुक्ती निश्चित झाली. संबंधित समितीचा उद्देश सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित विविध उद्योगांतील कामगारांचे किमान वेतन निश्चित करणे तसेच त्यांच्या मूलभूत हक्कांबाबत शासनाला शिफारसी करणे असा आहे. महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाच्या समितीत स्नेहल सांगळे या ग्रामीण भागातील स्थानिक सामाजिक नेतृत्वाचा समावेश झाल्याने कामगारांच्या समस्यांचे वास्तव चित्र शासनापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दि. ८ सप्टेंबर रोजी मुंबईतील कामगार भवन येथे कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य श्री. तीमोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीस सांगळे उपस्थित राहून सिमेंट व सिमेंटवर आधारित उद्योग या विषयावर भूमिका मांडली. सांगळे यांच्या निवडीमुळे सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण असून विविध कामगार संघटना, शैक्षणिक संस्था, उद्योजक तसेच स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
चौकट –
“कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमात माझी निवड झाली, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. समाजातील तळागाळातील कामगारांचे प्रश्न मांडणे हेच माझे ध्येय राहील.” – स्नेहल सुरेंद्र सांगळे