राहुरी वेब प्रतिनिधी(शरद पाचारणे )१३ सप्टेबर –
गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळालेला नाही. सध्या प्रभारी मुख्याधिकारीमार्फत नगरपरिषद चालवली जात असल्याने नागरिकांच्या दैनंदिन गरजांच्या व अनेक महत्त्वाच्या विकासकामांच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे, अशी माहिती डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांनी दिली.
यामध्ये बिहाणी प्लॉट येथील ओपन स्पेसमधील स्विमिंग पूल बांधकाम, त्यासमोरील गार्डन, कोर्ट टॉवर, भुयारी गटार योजना पूर्ण झालेल्या भागांतील रस्ते, शहर व वाड्या-वस्त्यांवरील इतर रस्ते, नगरपरिषदेच्या मालमत्तेवरील शास्ती माफी योजना, घरकुल लाभार्थ्यांचे हफ्ते अदा करणे, अनुकंपा व वारसा हक्कावरील रिक्त पदांची भरती, अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन, मोकाट जनावरांचा बंदोबस्त आदी अनेक कामे प्रलंबित आहेत. काही कामांसाठी शासनाचे थेट निर्देश असतानाही केवळ प्रशासकीय दुर्लक्षामुळे ती कार्यवाही ठप्प झाल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपरिषदेच्या प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन नगरपरिषद कार्यालयासमोर जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही डॉ. उषाताई तनपुरे यांनी दिला.