नगर मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ बाह्य मार्गाने वळवावी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

राहुरी, १२ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार): नगर-मनमाड महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज सकाळी राहुरी कृषी विद्यापीठाजवळ घडलेल्या अपघातात आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला. यामुळे संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून, त्यांनी या महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक तातडीने पर्यायी मार्गावर वळवावी, अशी जोरदार मागणी केली.

या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला अवजड वाहतूक बाह्यमार्गे वळवण्याच्या तातडीच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जनतेच्या सुरक्षेसाठी हे पाऊल अत्यावश्यक आहे.

प्रशासनानेही तत्परतेने कृती करत, नगर-मनमाड महामार्गावरील जड वाहतूक आता येवला – कोपरगाव – पुणतांबा – श्रीरामपूर – नेवासा मार्गे संभाजीनगर-नगर महामार्गावर वळविण्यात येणार आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे दुपार पर्यंत आदेश काढणार असल्याचे समजते.

स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रशासनाला दिलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *