राहुरी, ११ सप्टेंबर (प्रतिनिधी – शरद पाचारणे): राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील उत्तरेकडील गावातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार मुलींच्या वडिलांनी ९ सप्टेंबर रोजी दाखल केली होती. तक्रारीनंतर तात्काळ कारवाई करत राहुरी पोलिसांनी मुलींचा शोध सुरू केला.
तांत्रिक तपास व गुप्त माहितीदारांच्या मदतीने अपहरित मुली आणि आरोपी पुणे येथे असल्याचे समजताच पोउपनि. नितीन सप्तर्षी, पोना. देविदास कोकाटे, पोकॉ. गणेश लिपणे, मपोकॉ. वंदना पवार यांच्या पथकाने खडकी पोलीस स्टेशन, पुणे पोलीस आयुक्तालय व महिला दामिनी पथकाच्या मदतीने १० सप्टेंबर रोजी कारवाई करत दोन्ही मुलींची सुटका केली. तसेच आरोपी हर्षल सतीश इरुळे (रा. गुहा, ता. राहुरी) याला ताब्यात घेण्यात आले.
पीडित मुलींनी पोलिसांस दिलेल्या जबाबात आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या अज्ञानाचा व असहाय्यतेचा गैरफायदा घेत जबरदस्तीने पळवून नेल्याचे सांगितले. त्यामुळे भारतीय दंड संहिता ८७ कलमान्वये वाढ करून आरोपीवर अधिक गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. विष्णू आहेर हे करत आहेत.
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राहुरी पोलिसांनी गेल्या वर्षभरात तब्बल ८२ हरवलेल्या मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात सुरक्षित सुपूर्द केले आहे.
“मुलींनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. शालेय विद्यार्थिनींना कोणी त्रास देत असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल,” असे आवाहन राहुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांनी केले.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोउपनि. नितीन सप्तर्षी, पोउपनि. विष्णू आहेर, पोहेकॉ. सुरज गायकवाड, राहुल यादव, पोकॉ. गणेश लिपणे, शेषराव कुटे, आजिनाथ चेमटे, मपोकॉ. वंदना पवार तसेच श्रीरामपूर सायबर सेलचे पोहेकॉ. संतोष दरेकर व सचिन धनाड यांनी सहभाग घेतला.