राहुरी, ११ सप्टेंबर (प्रतिनिधी – शरद पाचारणे):
दूध सांडल्याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून एका मुलाने वडिलांना लोखंडी गजाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील उंबरे गणपती चारी येथे घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
भानुदास दगडू काळे (रा. उंबरे गणपती चारी) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, १० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सहा वाजता, दूध काढण्याच्या वेळेस त्यांचा मोठा मुलगा गणेश भानुदास काळे याच्याकडून गाईचे दूध सांडले. यावर वडील भानुदास काळे यांनी त्याला समज दिली की, “दुधाला भाव नाही आणि तू वारंवार दूध सांडवतोस, त्यामुळे आपल्या कष्टाचा काही उपयोग होत नाही.”
या वादातून संतप्त झालेल्या गणेशने वडिलांना शिवीगाळ केली आणि “तू लय माजला आहेस, तुझ्याकडे पाहतो,” असे म्हणत त्यांच्याशी झगडा केला. त्यानंतर त्याने लोखंडी गजाने भानुदास काळे यांच्या डाव्या डोक्यावर आणि कमरेवर मारहाण केली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गणेश भानुदास काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.