राहुरी, ११ सप्टेंबर (प्रतिनिधी – शरद पाचारणे): राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द येथे खर्चासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने आई-वडिलांवर कोयत्याने जीव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता अशोक आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्या आपल्या पती अशोक आढाव आणि मुलगा अमोल अशोक आढाव यांच्यासोबत राहतात. कुटुंब शेती करून उदरनिर्वाह करत असताना मुलगा अमोल हा नेहमी खर्चासाठी पैसे मागत असतो.
मंगळवारी (दि. 9 सप्टेंबर 2025) सकाळी साडेअकराच्या सुमारास अमोलने आई वडील संगीता अशोक आढाव यांच्याकडे पैसे मागितले. त्यावेळी त्यांनी पैसे नसल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या अमोलने हातात कोयता घेऊन आई-वडिलांना शिवीगाळ केली व दमदाटी करत वडील अशोक आढाव यांच्यावर हल्ला केला.
या वेळी आई संगीता आढाव मध्ये गेल्याने अमोलने कोयत्याने त्यांच्या डाव्या-उजव्या मनगटावर तसेच उजव्या खांद्यावर वार केले. यात त्या जखमी झाल्या. तसेच अमोलने वडील अशोक आढाव यांना धक्काबुक्की करून कोयत्याने डोक्याच्या मागील बाजूस वार करून जखमी केले. “तुम्ही मला पैसे दिले नाहीत तर पुन्हा असेच मारणार,” अशी धमकीही त्याने दिली.
या प्रकरणी संगीता आढाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल अशोक आढाव याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संभाजी बडे करत आहेत.