राहुरी कृषी विद्यापीठाबाहेर ट्रकच्या टायरला आग; सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे)९ सप्टेंबर २०२५: नगर-मनमाड महामार्गावर, राहुरी कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पंजाबहून बंगळुरूकडे बटाटे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकच्या मागील टायरला अचानक आग लागली. वेळीच सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात आल्याने आणि त्यांनी तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे मोठी हानी टळली. या सतर्कतेबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

ही घटना सकाळी घडली. सकाळच्या सत्रात विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहनांची मोठी गर्दी असते. याच वेळी कंत्राटी सुरक्षा रक्षक अनिल नजन हे आपले कर्तव्य बजावत असताना, त्यांना ट्रक (क्रमांक RJ 14 GJ 5023) च्या मागील टायरमधून धूर येत असल्याचे दिसले. ट्रक पेटून मोठे नुकसान होऊ शकते, तसेच रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ शकते हे लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच, सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे, सुरक्षा पर्यवेक्षक राहुल पवार, दत्ता आडसुरे, तुषार गिरगुणे, रवी येणारे, कल्याण मेटे, गोरक्षनाथ भालेराव, तसेच सुरक्षा रक्षक अभिजीत शिंदे, सचिन गवते, अनिल नजन आणि अक्षय येणारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळील अग्निशमन यंत्रणा (फायर इस्टिंग्विशर) घेऊन त्यांनी तात्काळ आग विझवली.

या वेळी मदतकार्य करणाऱ्या सर्व सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या या धाडसी व सतर्क कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. त्यांच्या या कार्याचे विद्यापीठ परिसरात तसेच पंचक्रोशीमध्ये कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *