डॉ. साताप्पा खरबडे भारत शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे, दि. ८ सप्टेंबर, २५:

        महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक शिक्षण डॉ. साताप्पा खरबडे यांना मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय पातळीवरचा भारत शिक्षण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन टीचर्स वेल्फेअर असोसिएशन, बंगळुरू यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त प्रदान करण्यात आला. शिक्षण, संशोधन आणि विस्तार या क्षेत्रातील डॉ. खरबडे यांच्या 29 वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. साताप्पा खरबडे यांचे 115 शास्त्रीय लेख, 155 तांत्रिक लेख विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेले असून त्यांनी 30 घडीपत्रिका व दहा पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या नावावर दोन पेटंट आहेत. त्यांनी आतापर्यंत एम. एस. सी. च्या 22 विद्यार्थ्यांना व आचार्य पदवीच्या 12 विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे. त्यांनी शेतकर्यांसाठी 25 तंत्रज्ञान शिफारशी दिलेल्या असून त्यांनी 40 पेक्षा जास्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे 12 पेक्षा जास्त विविध पुरस्कार मिळालेले असून त्यांनी कोलंबो, श्रीलंका व थायलंड या देशांमध्ये शैक्षणिक विषयासंदर्भात परदेशदौरे केलेले आहेत.

          डॉ. साताप्पा खरबडे यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या  कृषी शिक्षण, कृषी संशोधन आणि विस्तार शिक्षणात केलेले कार्य व कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पण वृत्तीचा सन्मान आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून कार्याची सुरुवात करून डॉ. खरबडे यांनी कृषी महाविद्यालय नंदुरबार, कराड आणि कोल्हापूर येथे सहयोगी अधिष्ठाता म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे. सध्या ते अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. डॉ. खरबडे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव श्री. राजेन्द्रकुमार पाटील, नियंत्रक श्री. सदाशिव पाटील तसेच विद्यापीठातील इतर अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *