राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ),५सप्टेंबर: राहुरी पोलीस लाईन येथील दत्त मंदिरात पोलीस अंमलदारांच्या मुलांनी स्थापन केलेल्या गणेशाची मिरवणूक दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी टाळ-मृदंगाच्या गजरात काढण्यात आली. ही मिरवणूक शहरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आणि सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनली.
या मिरवणुकीत राहुरी तालुक्यातील पाच प्रमुख वारकरी शिक्षण संस्थांचे २०० ते २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्था (वांबोरी), ज्ञानई वारकरी शिक्षण संस्था (वांबोरी), संत कवी महिपती महाराज वारकरी संस्था (ताहाराबाद), विठ्ठल वारकरी संस्था (वांबोरी) आणि चैतन्य वारकरी शिक्षण संस्था (जोगेश्वरी आखाडा) यांचा समावेश होता.
दुपारी ४ वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रात्री ८ वाजेपर्यंत चालली. शहरातील विविध गणेश मंडळांनी आणि व्यापारी असोसिएशनने मिरवणुकीचे स्वागत केले. त्यांनी चहा, पाणी आणि फराळाची व्यवस्था करून सहकार्य केले.
या मिरवणुकीसाठी निमसे पाटील (टाकळीमिया) यांनी रथ उपलब्ध करून दिला. तसेच, निवेदक बापू तनपुरे, सुदेश बोरुडे, गणेश वाघ आणि पोपट शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.