नगर-मनमाड रस्त्याप्रश्नी कृती समितीचा रास्ता रोकोचा इशारा, प्रशासनाला दिले निवेदन

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ),५सप्टेंबर:नगर-मनमाड रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मागील आठवड्यात राहुरी परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चार निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समिती ने येत्या १० सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

कृती समितीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना लेखी निवेदन दिले असून, विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या निवेदनात खालील प्रमुख मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत:

नगर ते कोपरगाव मार्गाचे संपूर्ण डांबरीकरण करून पेव्हमेंट स्वरूपात रस्ता तयार करणे.

देवळाली नगरपरिषद हद्दीतील साईड गटार भूमिगत करणे.

भविष्यातील सर्व्हिस रोड लक्षात घेऊन सध्याचे भूमिगत ट्रेनिंगचे नियोजन करणे.

सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची माहिती फ्लेक्स बोर्डवर जनतेसाठी जाहीर करणे.

रस्ता डांबरीकरण पूर्ण न झाल्यास जड वाहतुकीस बंदी घालून पर्यायी मार्गाने वळविणे.

कृती समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रशासनाने जर तातडीने योग्य पावले उचलली नाहीत, तर १० सप्टेंबर रोजी रास्ता रोकोसारख्या तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल.

या निवेदनप्रसंगी कृती समितीचे वसंत कदम, अनिल येवले, देवेंद्र लांबे, प्रशांत मुसमाडे, आदिनाथ कराळे, बाळासाहेब लोखंडे, दत्ता गागरे, प्रशांत काळे, कांता तनपुरे, प्रतीक तनपुरे, गजानन सातभाई, अनिल कासार, प्रकाश पारख, सतिष घुले, विजय तमनर, कैलास वाघमारे, रमाकांत खडके, राजेंद्र लांडगे, निखिल गोपाळे, गणेश खैरे, अरुण साळवे, सोमनाथ गीते, सुनील पानसंबळ, ज्ञानदेव निमसे, रविंद्र नालकर, विकास साळुंके, आप्पासाहेब मोकळ, निलेश मुंढे, संजय नलावडे, राजेंद्र लोखंडे, सतीश बोरुडे, रमाकांत गीते, विशाल वने, नसीब पठाण, जगू वरखडे, अनिल वाणी, प्रितेश तनपुरे, सचिन चौधरी, विजय भिंगारे यांच्यासह असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासन आता या आंदोलनाची दखल घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *