प्रेरणा पतसंस्थेचे कामकाज नियमाधारित, पारदर्शक असल्यामुळेच लोकांचा विश्वास – माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे )०४ सप्टेंबर – केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात विश्वास संपादन केलेल्या प्रेरणा पतसंस्थेच्या माध्यमातून होणारे व्यवहार हे पारदर्शक असल्यामुळे ठेवीदार आणि कर्जदार या दोघांनाही न्याय मिळत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यातील ब्राम्हणी येथे प्रेरणा पतसंस्थेच्या आठव्या शाखेचे उद्घाटन तनपुरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी तनपुरे यांनी पतसंस्थेच्या नियमबद्ध आणि शिस्तबद्ध कामकाजाचे कौतुक केले. ते म्हणाले की, ‘संस्थेतून घेतलेल्या छोट्या कर्जावर थोडा उशीर झाल्याने मला दंड भरावा लागला होता. यामुळेच मला खात्री पटली की नियम सर्वांसाठी सारखे आहेत आणि त्यामुळेच आपले पैसे येथे नक्की सुरक्षित राहतात.’
खाजगी सावकारीवर परखड भाष्य
यावेळी बोलताना तनपुरे यांनी खाजगी सावकारीच्या समस्येवरही तीव्र भाष्य केले. ते म्हणाले, ‘आज राही तालुक्यात खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. त्यांच्या व्याजाचे आकडे ऐकले की कान बधिर होतात. अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. दुर्दैवाने या सावकारांवर कडक कारवाई होण्याऐवजी कधी-कधी पोलीस ठाण्यातच त्यांना मान-सन्मान मिळतो. या गैरव्यवस्थेला पायबंद बसला पाहिजे.’
१९९३ साली एका छोट्या रोपट्याप्रमाणे सुरू झालेली ही संस्था आज एका वटवृक्षाप्रमाणे विस्तारली आहे. ठेवीदारांचा विश्वास संपादन करून संस्थेने आपल्या कामकाजात पारदर्शकता ठेवली आहे. यामुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी, लघुउद्योग आणि सामान्य कुटुंबे यांच्यासाठी प्रेरणा पतसंस्था मोठा आधार ठरत आहे, असेही तनपुरे यांनी सांगितले. आगामी काळात २०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट साध्य करण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पतसंस्थांच्या क्षेत्रातील अडचणींवर प्रकाश टाकला. अनाधिकृत संस्था कशाप्रकारे फसवणूक करतात आणि जास्त व्याजाच्या अमिषामुळे ठेवीदार कसे फसतात, याची वास्तववादी मांडणी त्यांनी केली. प्रत्येक ठेवीदाराने पतसंस्थेची पार्श्वभूमी, ऑडिट वर्ग आणि कामकाजाची तपासणी करूनच पैसे ठेवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या ३२ वर्षांपासून प्रेरणा पतसंस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ’ असून संस्थेकडे सध्या १२५ कोटींच्या ठेवी आणि ७८ कोटींचे कर्ज वाटप आहे. कोणत्याही परिस्थितीत ठेवीवर मर्यादितच व्याज देता येते, जास्त व्याजाच्या नावाखाली अनेक पतसंस्थांनी लोकांची फसवणूक केल्याचेही वाबळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले, तर आभार प्रा. वेणूनाथ लांबे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *