श्रीरामपूर शहर वेब टिम ,२ ऑगस्ट : शहरात वाढलेल्या कर्णकर्कश आवाजाच्या गाड्या आणि विना नंबर प्लेटच्या वाहनांमुळे होणारा त्रास लक्षात घेऊन श्रीरामपूर वाहतूक पोलिसांनी सोमवारी विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ९७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ४८ गाड्या जप्त केल्या आहेत.
अनेक वाहनचालक आपल्या गाड्यांचे मूळ सायलेन्सर काढून परवानगी नसलेले, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरतात. या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तसेच, अनेकदा गुन्हेगारी कृत्यांसाठी विना नंबर प्लेटच्या गाड्यांचा वापर होतो. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली.
या मोहिमेत पोलिसांनी एकूण ९७ वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली. यात, ४८ गाड्या विना नंबर प्लेट आढळल्याने त्या जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. या चालकांकडून दंड वसूल करून त्यांना तातडीने नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश देण्यात आले. याव्यतिरिक्त, मॉडिफाय सायलेन्सर वापरणाऱ्या ६ दुचाकींवरही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या वाहनांचे अनधिकृत सायलेन्सर काढून मूळ कंपनीचे सायलेन्सर बसवून ती वाहने चालकांना परत केली.
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. त्यांनी सर्व वाहनचालकांना आपल्या गाड्यांना दोन्ही बाजूंना नंबर प्लेट असल्याची खात्री करण्यास आणि मॉडिफाय सायलेन्सर वापरत असल्यास तो बदलून मूळ कंपनीचा सायलेन्सर बसवण्याचे आवाहन केले आहे. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली असून, सुजाण नागरिकांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.