राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे )०१ सप्टेंबर : “घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये” अशी मागणी करत एका २७ वर्षीय विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे, दीर, नणंदा आणि काही नातेवाईकांसह १३ जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली प्रवरा येथील प्रियंका सचिन मुसमाडे हिचे लग्न ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी सचिन अशोक मुसमाडे यांच्याशी झाले होते. सुरुवातीला काही काळ सर्वकाही सुरळीत होते. त्यांना एक मुलगाही झाला. मात्र, त्यानंतर पती सचिन हा दारू पिऊन प्रियंकाला मारहाण करू लागला. सासरच्या मंडळींनी लग्नात मानपान, दागिने आणि पैसे दिले नाहीत, असे म्हणत तिचा छळ सुरू केला.
पीडितेने तिच्या आईकडे याबाबत तक्रार केली असता, त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, सासरच्या मंडळींचा त्रास कमी झाला नाही. काही काळानंतर सासरे अशोक मुसमाडे यांनी प्रियंकाकडे घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे आणले नाहीत, तर घरी परत येऊ नकोस, अशी धमकीही त्यांनी दिली. यावर प्रियंकाने आईची गरिबीची परिस्थिती सांगितली असता, तिला शिवीगाळ करून घरातून हाकलून देण्यात आले.
पुन्हा एकदा नातेवाईकांनी मध्यस्थी करून प्रियंकाला सासरी पाठवले. पण, पाच-सहा महिन्यांनंतरही दोन लाख रुपयांवरून तिला पुन्हा मारहाण करण्यात आली आणि सप्टेंबर २०२३ मध्ये तिला घराबाहेर काढण्यात आले.
यानंतर प्रियंका आपल्या मुलासह माहेरी राहायला गेली. तिने पुढील शिक्षणासाठी विवेकानंद इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. तिथेही तिचा पती सचिन आला आणि त्याने तिला मारहाण करून शिक्षण सोडून देण्यास सांगितले. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अनेकदा प्रयत्न करूनही सासरचे लोक तिला नांदवण्यास तयार नव्हते.
या त्रासाला कंटाळून प्रियंकाने अहिल्यानगर येथील भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल केली. तिथेही सासरचे लोक नांदवण्यास तयार झाले नाहीत. शेवटी, प्रियंकाने पती सचिन अशोक मुसमाडे, सासरे अशोक देवराम मुसमाडे, सासू कल्पना अशोक मुसमाडे, दीर ज्ञानेश्वर अशोक मुसमाडे, नणंद पुनम जालिंदर तोडमल, नणंद सोनाली दादासाहेब गवारे यांच्यासह इतर सात नातेवाईकांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या सर्व १३ आरोपींनी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, या कारणावरून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ, शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.