राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे )०१ सप्टेंबर :राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका व्यक्तीला ‘माव्याच्या टपरीची टीप पोलिसांना देतो का’ असे विचारून दोघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय चंद्रकांत वेताळ हे २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आपल्या घरासमोर उभे होते. त्यावेळी त्यांचे शेजारी असलेले पप्पू जाधव (पूर्ण नाव माहित नाही) आणि निखिल सुनील दळवी हे दोघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी वेताळ यांना शिवीगाळ करत “तू आमच्या माव्याच्या टपरीची टीप पोलिसांना देतो का?” असे विचारले. यानंतर पप्पू जाधवने हातातील लोखंडी पाईपने वेताळ यांच्या डाव्या हाताच्या बोटावर आणि मांडीवर मारले, तर निखिल दळवीने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात वेताळ जखमी झाले.
मारहाण केल्यानंतर आरोपींनी वेताळ यांना “जर पुन्हा आमच्या नादी लागलास, तर जीवे ठार मारू,” अशी धमकीही दिली. या घटनेनंतर संजय वेताळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वेताळ यांच्या फिर्यादीनुसार, पप्पू जाधव (पूर्ण नाव माहित नाही) आणि निखिल सुनील दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.