राहुरी पोलिसांची मोठी कारवाई: 38 विना नंबरप्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई

राहुरी वेब प्रतिनिधी ( शरद पाचारणे )३१ ऑगस्ट: राहुरी शहरात चोरीच्या दुचाकींचा वापर वाढत असल्याच्या तक्रारीनंतर राहुरी पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या चौथ्या दिवशी, पोलिसांनी नंबरप्लेट नसलेल्या ३८ दुचाकींवर कारवाई करत एकूण रु. २१,७५०/- चा दंड वसूल केला.

पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की अनेक चोरीच्या गाड्या कमी किमतीत विकल्या जातात आणि त्यांचा वापर विना नंबरप्लेट केला जातो. यामुळे चोरीच्या गाड्या शोधणे अधिक कठीण होते. या माहितीच्या आधारे, दिनांक ३१/०८/२०२५ रोजी राहुरी पोलिसांनी ही तपासणी मोहीम राबवली.या कारवाईदरम्यान, पोलिसांनी पकडलेल्या गाड्यांवर तातडीने नंबरप्लेट बसवून त्या त्यांच्या मालकांकडे परत केल्या.
राहुरी पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी त्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना नंबरप्लेट बसवाव्यात. यामुळे अनावश्यक दंडाची कारवाई टाळता येईल आणि चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांना तपास करणे सोपे होईल.
नवीन वाहनांवर नंबरप्लेट नसताना ती रस्त्यावर आणल्याबद्दल पोलिसांनी शोरूम मालकांवरही कारवाई करण्याचे ठरवले आहे. यासाठी आरटीओमार्फत त्यांना पत्र पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल.पोलिसांनी पालकांना विशेष सूचना दिली आहे की त्यांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यासाठी देऊ नये. असे आढळल्यास संबंधित पालकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. देवदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकामध्ये पोसई आहेर, सफौ. भाऊसाहेब आव्हाड, पोहेकॉ. संतोष ठोंबरे, पोहेकॉ. रमेश दरेकर, पोहेकॉ. बापु फुलमाळी आणि होमगार्ड कर्मचारी यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *