राहुरी वेब प्रतिनिधी(शरद पाचारणे )३० ऑगस्ट : – वारकरी संप्रदाय जसा समाजातील लोकांना एकत्र आणतो, त्याचप्रमाणे शिक्षकही विद्यार्थ्यांमधील गुण-दोषांना ओळखून त्यांना योग्य दिशा देतात. राहुरी तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक उत्तमराव खुळे यांचे कार्य असेच दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन नेवासा येथील संत तुकाराम महाराज देवस्थानचे मठाधिपती ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.
राहुरी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक उत्तमराव हनुमंता खुळे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे होते.
ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले की, उत्तमराव खुळे यांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी पुढेही मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी सांगितले की, मुख्याध्यापक खुळे यांनी आपल्या पदाचा वापर विद्यार्थी आणि सहकाऱ्यांशी आपुलकीचे संबंध निर्माण करण्यासाठी केला. ब्राम्हणी, मांजरी, राहुरी, राहुरी फॅक्टरी अशा विविध ठिकाणी सेवा करताना त्यांनी केवळ अध्यापनाचेच नव्हे, तर माणसे जोडण्याचेही काम केले.
सत्काराला उत्तर देताना उत्तमराव खुळे भावूक झाले. त्यांनी आपल्या सेवेच्या सुरुवातीपासून मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले की, जरी मी सेवेतून निवृत्त होत असलो तरी, यापुढेही विद्यार्थी आणि समाजासाठी काम करत राहीन.
यावेळी उत्तमराव खुळे आणि त्यांच्या पत्नी सौ. वैशालीताई खुळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आसाराम ढुस, शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, आप्पासाहेब शिंदे, उत्तमराव म्हसे यांच्यासह अनेक मान्यवर आणि श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी केले.