कृषि यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचे परिश्रम कमी झाले – डॉ. शिर्के

राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे )२९ ऑगस्ट : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात, अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ‘कृषि यांत्रिकीकरण काळाची गरज’ या विषयावर एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेतीमधील यांत्रिकीकरणाचे महत्त्व आणि त्याचे फायदे यावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विठ्ठल शिर्के, संशोधन संचालक, मफुकृवि, राहुरी यांनी कृषि यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होत असून, उत्पादन वाढ आणि निविष्ठांचा योग्य वापर करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी महिला शेतकऱ्यांनीही या प्रशिक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड यांनी कृषि क्षेत्राची आत्मनिर्भरतेकडे होत असलेली वाटचाल आणि त्यात यांत्रिकीकरणाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकल्प प्रमुख डॉ. तुळशिदास बास्टेवाड यांनी प्रकल्पाची आणि सध्याच्या काळात यांत्रिकीकरणाची गरज याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला कृषिभूषण महिला शेतकरी सौ. प्रभावती घोगरे आणि प्रगतशील शेतकरी श्री. मच्छिंद्र घोलप यांनीही आपले विचार व्यक्त केले.

तांत्रिक सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात विविध तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले:

डॉ. तुळशिदास बास्टेवाड: मफुकृवि, राहुरी येथे विकसित केलेली आधुनिक कृषि अवजारे व यंत्रे.

डॉ. सचिन नलावडे: आधुनिक शेतीत ड्रोनचा वापर आणि त्याचे महत्त्व.

डॉ. रविकिरण राठोड: ऊस शेतीसाठी उपयुक्त यांत्रिकीकरण.

प्रा. महेश पाचारणे: फळबागेसाठी उपयुक्त यांत्रिकीकरण.

डॉ. संजय भांगरे: कृषि अवजारे व यंत्रे यांची निगा, देखभाल व दुरुस्ती.

यावेळी शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश पाचारणे यांनी केले तर डॉ. संजय भांगरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजि. सलीम शेख, इंजि. मयुर शिंदे, इंजि. गिरीश भणगे आणि सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. हनुमंत गाव, हसनापुर, लोणी, सात्रळ यांसारख्या विविध गावांमधून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *