राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे),२७ ऑगस्ट: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यातील प्रभावी जिल्हाध्यक्ष रवींद्र बापूसाहेब मोरे यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देत मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे.
या प्रवेशादरम्यान मोरे यांची पश्चिम महाराष्ट्र शेतकरी सेना उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. मोरे हे केवळ जिल्हाध्यक्ष नव्हते, तर ऊसदर, वीजदर, हमीभाव आणि दुष्काळी मदत यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी अनेक आक्रमक आंदोलने केली होती. त्यांच्या या धडाडीच्या नेतृत्वामुळेच जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठी ताकद मिळाली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच त्यांनी राजू शेट्टींचा हात सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.या प्रवेशाच्या वेळी सुभाष जुंदरे ,बाळासाहेब जाधव, विजय तोडमल ,सतिश पवार, प्रमोद पवार ,आनंद वने, रविकीरन ढुस, धनंजय लाहरे ,सचिन गडगूळे, राहुल करपे, संदिप शिरसाठ, निलेश लांबे ,सचिन पवळे ,रामभाऊ जगताप, सचिन म्हसे ,किशोर वराळे उपस्थित होते. रवींद्र मोरे यांच्या प्रवेशानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. एका बाजूला, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यात नेतृत्वशून्य होण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला रवींद्र मोरे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गट) जिल्ह्यात अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.