राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे ) २६ ऑगस्ट २०२५: फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. यश अनिल डौले (वय २७, रा. जोगेश्वरी आखाडा, ता. राहुरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, यश डौलेने तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या गंभीर गुन्ह्याची नोंद राहुरी पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत करण्यात आली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी यश डौलेला शोधून काढले आणि त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक केली. उद्या त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची (PCR) मागणी करण्यात येणार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पोलीस हवालदार सतीश आवारे आणि पोलीस नाईक कुदळे करत आहेत.