राहुरी वेब प्रतिनिधी (शरद पाचारणे) : राहुरी तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या “बुळे पठार” या महसुली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी करत ग्रामस्थांनी राहुरी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईविरोधात हे पहिलेच आंदोलन होते.
बुळे पठारला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी यासाठी चिखलठाण ग्रामपंचायतीने सप्टेंबर २०२३ मध्येच आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामसेवक याबाबत समाधानकारक उत्तरे देत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. याच दिरंगाईचा निषेध म्हणून हे धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची दखल घेत सहाय्यक प्रशासक अधिकारी लहांगे जी.के. आणि कनिष्ठ सहाय्यक बी.डी. पवार यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. या पत्रानुसार, १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत बुळे पठारच्या स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून त्यावर कार्यवाही केली जाईल. तसेच, संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून हा अहवाल विहित मुदतीत सादर केला जाईल, असेही नमूद करण्यात आले.
यावर, आंदोलनातून संदीप कोकाटे यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्व अहवाल सादर केले गेले नाहीत, तर वीस दिवसांनंतर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
या आंदोलनात श्रमिक मुक्ती दल आणि लोकशाहीवादीचे कार्यकर्ते, तसेच संजय दुधवडे, मच्छिंद्र दुधवडे, कैलास बुळे, लक्ष्मण वाघ, सखाराम वाघ, रघुनाथ बुळे, पंढरीनाथ भूतांबरे, नवनाथ केदार, सोमनाथ केदार, सुभाष केदार, रावजी भुतांबरे, सुखदेव भुतांबरे, सुमनबाई केदार, संदीप वाघ, भास्कर केदार, सतीश खांडवे आणि राजेंद्र जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.